लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘टेकइनोवा’ या तंत्रस्नेही मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी झाले. पहिल्याच दिवशी या मेळाव्यात तब्बल ३,३४२ विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण आणि खेळांमध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आविष्कारांमुळे महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता.देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून ‘टेकइनोवा’ इव्हेंटला सुरुवात झाली. रविवारपर्यंत चालणाºया या इव्हेंटचे उद्घाटन ‘सीएमआय’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, सलीम शेख आदी उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये पेंटबॉल, रोबोरेस, लाईन फॉलोव्हर, रोडीस, साईनीजिन्स, कॅडमेनिया, पिक्सल, सरर्किटरिक्स, रॉकेट बुस्टर, किंग आॅफ बोर्ड या प्रकारच्या खेळांचा समावेश होता. या इव्हेंटमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन यंत्र, प्रकल्प तयार करून पाहण्यासाठी मांडले आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे. या इव्हेंटमध्ये देवगिरी अभियांत्रिकी, शासकीय, जेएनईसी, पीईएस, श्रेयस, हायटेक, सीएसएमएस, आयजीटीआर, आयसीईईएम, नायलेट या अभियांत्रिकी महाविद्यालयांसह शासकीय, पीईएस, एमजीए तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थीही सहभागी झाले असल्याची माहिती समन्वयक प्रा. रोहित कोळेकर यांनी दिली.या इव्हेंटमध्ये पेंटबॉल हा खेळ मराठवाड्यात पहिल्यांदाच आयोजित केला आहे. या खेळात तब्बल ४०० पेक्षा अधिक संघांनी भाग घेतला. याशिवाय रोबोरेसला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या इव्हेंटच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास शिऊरकर यांच्या मार्गदर्शनात प्रा. रोहित कोळेकर, प्रा. अमर पाटील, प्रा. एस. जी. शहा, प्रा. दुर्गेश तुपे, प्रा. सुहास गायके, प्रा. उमेश पाटील आदी प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांनी भरवला विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:53 AM