वाळूज महानगर: तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले. बिनधास्तपणे विद्युप मोटारी टाकून सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या तीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
तीसगाव पाझर तलावातून तीसगावसह लगतच्या शरणापूर व धरमपूर या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने ही तीनही गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात अत्यल्प जलसाठा आहे. परिसरातील शेतकरी व जनावरासाठी हा तलाव एकमेव जलस्त्रोत आहे. अत्यल्प पाऊस आणि उन्हाचा पारा पाहता दिवसेंदिवस तलावातील पाणी पातळी खालावत आहे.
केवळ दीड-दोन महिने नागरिकांना पाणी पुरेल एवढाच जलसाठा आहे. बोअर व विहिरीनेही तळ गाठला आहे. परंतू काही दिवसांपासून तीसगावसह शरणापूर, धरमपूर, मीटमीटा परिसरातील काही शेतकरी तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करीत असल्याचे आढळून आले आहे. शरणापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय विहीरीलगत अनेकांनी तलावाच्या चारीत विद्युत मोटारी टाकून बिनदिक्कतपणे पाण्याचा उपसा सुरु केला आहे. विशेष म्हणजे या मोटारींना आकडे टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे. या भागात जवळपास १० ते १२ विद्युत मोटारी लावून दिवस-रात्र लाखो लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. पाणीचोरी कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून झाडा-झुडपात अडचणीच्या ठिकाणी या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. हा प्रकार माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे व ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी उघडकीस आणला आहे.
तीन गावांवर टंचाईचे संकटतीसगाव, शरणापूर व धरमपूर या तीन गावांना दीड-दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा तलावात आहे. यातून पाणीचोरी सुरुच राहिल्यास हा तलाव अल्पावधीतच कोरडा पडण्याची शक्यता आहे. जलसाठा संपुष्टात आल्यानंतर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणारनागरिकांना दीड-दोन महिने पुरेल एवढेच पाणी तलावात शिल्लक आहे. यावरच गावची तहान भागते. विद्युत मोटारी टाकून तलावातील पाण्याचा उपसा केला जात असल्याने येणाºया काळात नागरिकांना प्यायला पाणी मिळणार नाही. पाणीचोरी रोखण्यासाठी ग्रामपंचायत मंगळवारी जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संरपच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकस अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.