औरंगाबाद: वाळू वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराकडून दिड लाख रुपये लाच घेतांना औरंगाबादच्या अप्पर तहसीलदारालालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री ११:०५ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरातील देशमुखच्या घराच्या रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईने महसुल विभागात खळबळ उडाली.
तक्रारदार हे अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. हा व्यवसायात आडकाठी न आणण्यासाठी आणि पोलीस ठाण्यात लावलेल्या हायवा ट्रक सोडण्यासाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी यापुढे कारवाई न करण्यासाठी तहसीलदार किशोर देशमुख यांनी लाच म्हणून ४ लाख ७० हजार रुपये लाच मागितली. शिवाय दरमहा ३ लाख रुपये हाफ्ता मागितला होता. यापैकी दिड लाख रुपये घेऊन त्यांनी आज तक्रारदार यांना बोलावले होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे आणि त्यांच्या पथकाने दोन साक्षीदार तक्रारदार यांच्यासोबत देउन लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदाराला देशमुख यांनी लाचेची रक्कम आज आणून देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसानी देशमुखला पकडण्यासाठी आज रात्री रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचला. रात्री ११:०५ वाजेच्या सुमारास तहसीलदार देशमुख याने तक्रारदाराकडुन लाचेचे दिड लाख रुपये घेतले. लाच घेताच दबा धरुन बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी आरोपी देशमुखला रंगेहात पकडले. या कारवाईने महसुल विभागात खळबळ उडाली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.