छत्रपती संभाजीनगर : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड-पे-४ हजार ८०० रुपये करण्यात यावे. या मागणीसाठी १३ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज पुर्णत: ठप्प पडले होते. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कामावर हजर होते.
दरम्यान १४ मार्च तलाठी, महसूल कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहेत. महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले. ग्रेड पे वाढविण्यासाठी १९९८ पासून पाठपुरावा सुरु आहे. के.पी. बक्षी वेतन त्रुटी समिती समक्ष नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्यासंदर्भात संघटनामार्फत सादरीकरण करण्यात आले. परंतु वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार अद्याप झालेला नाही.
पहिल्या टप्यात १३ मार्च रोजी एक दिवसीय रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ३ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनात विभागीय संघटक विजय चव्हाण, तहसिलदार ज्योती पवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, जिल्हाध्यक्ष परेश खोसरे, प्रशांत देवडे, तेजस्विनी जाधव, अरुण पंडुरे, उद्धव नाईक, आर.व्ही. शिंदे, जी.टी.आवळे, प्रमोद गायकवाड, सचिन वाघमारे, सुधाकर मोरे, सुनील गायकवाड, रेवनाथ ताठे, योगिता खटावकर, आनंद बोबडे, प्रभाकर मुंढे हेमंत तायडे, आश्विनी डमरे आदींनी सहभाग नाेंदविला.
सरकारी कर्मचार्यांचा संप २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्य तलाठी संघ १०० टक्के सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे परेश खोसरे, मध्यवर्ती संघटनेचे देवीदास जरारे आदींच्य नेतृत्वात १४ पासून आंदोलन सुरू होणार आहे.