वैजापुर : कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरुनाथ इंदुलीकर यांना तहसीलदार राहुल गायकवाड यांनी फैलावर घेतले. नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, प्रत्येक आरोग्य केंद्राची पाहणी करीत रुग्णांच्या अडचणी सोडवा, असे सांगून इंदुलीकर यांची कानउघाडणी केली.
वैजापूर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेबाबत बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तहसीलदार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱी, कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोरोनाच्या संकट परिस्थितीतही तालुका वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असून, कोविड सेंटरकडेही त्यांचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी तहसीलदार गायकवाड यांच्याकडे आल्या.
या संदर्भात तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुरुनाथ इंदुलीकर यांना विचारणा केली. आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करून रुग्णसेवा देत आहेत आणि संकटकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष होत असेल, तर हे चुकीचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. शासन लाखो रुपये पगारावर खर्च करीत असेल आणि आपण जनतेच्या जिवाशी खेळ असाल तर योग्य नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले. येत्या काळात सुधारणा करून कोविड सेंटरला भेटी देणे, रुग्णाबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्याच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
तालुका आरोग्य अधिकारी यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कर्मचारी व रुग्णांच्या समस्या समजावून घ्यायला पाहिजे. मात्र, तसे न करता, कार्यालयात किंवा घरीच बसून कामकाज केले जात असल्याची तक्रार होती. कोरोना संकटकाळात कामात दुर्लक्ष व हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात येणार आहे.
- राहुल गायकवाड, तहसीलदार