औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे युवा सेनेची कमान सांभाळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी सध्या ते राजकारणात येणार नाहीत. तेजस हे वन्यजीवप्रेमी आहेत. अनेक वर्षे राज्यातील बहुतांश जंगलात जाऊन त्यांनी विविध प्रजातींचा शोध घेतला आहे. सध्या त्यांची आवड ही वाइल्डलाइफकडेच आहे. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असे युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
देसाई हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, या संपूर्ण दौऱ्यातून संघटन मोठे करण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापीठात सिनेट निवडणुका युवासेना लढविणार आहे. एखाद्या प्रभागात, वॉर्डात युवा सेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी चांगले काम करीत असेल तर स्थानिक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उमेदवारीची संधी देतील. तिकीट वाटप, निवडणुकांचे निर्णय शिवसेनेचे नेते घेत असतात. त्यांचा निर्णय युवासैनिकांना मान्य असेल. युवासेनेसाठी वेगळा विशेष कोटा निवडणुकीत असावा, असा विषय नाही. जो चांगले काम करीत ते पुढे येईल. त्याला संधी मिळेल. औरंगाबाद, जालना, बीडसह मराठवाड्यातील कोणत्याही जिल्हा युवा अधिकाऱ्याला राजकीय वारसा नसल्याचा, असा दावा देसाई यांनी केला.
कोरोना रुग्ण ज्या ठिकाणी वाढत आहेत, तेथे मेळावा घेण्यात येत नाही. गुरुवारी बीडमध्ये परवानगी नसताना मेळावा घेतल्याची गंभीर दखल घेतली आहे, असे देसाई म्हणाले. यावेळी अमोल घोले, आदित्य शिरोडकर, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे, मिथुन व्यास आदींची उपस्थिती होती.
पाच ते दहा वर्षे काम करणाऱ्यांना प्रमोशन
ज्या पदाधिकाऱ्यांनी पाच ते दहा वर्षे युवा सेनेच्या संघटनेत काम केले, त्यांना प्रमोशन देऊन त्यांच्या जागी नवीन कार्यकर्ते संघटनेत आणले जाणार आहेत, असे सांगून देसाई यांनी संघटनेत लवकरच फेरबदल होणार असल्याचे सुतोवाच केले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.