छत्रपती संभाजीनगर : जालन्यात पीटलाइनचे काम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले आणि उद्घाटनाला जालन्याहून नव्या रेल्वे सुरू करण्याची घोषणाही झाली. पण छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे कधी सुरू होणार? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही पीटलाइनचे काम सुरूच आहे.
मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना गेल्या ११ वर्षांत जवळपास सहा नव्या रेल्वे मिळाल्या. यात दररोज धावणाऱ्या दोनच रेल्वे आहेत. गेली अनेक वर्षे पीटलाइन नसल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यात येत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीटलाइनची मागणी होत असताना जालन्यातही पीटलाइन मंजूर झाली. दोन्ही ठिकाणच्या पीटलाइनचे उद्घाटन एकाच दिवशी झाले. मात्र, जालन्याच्या पीटलाइनचे उद्घाटनही झाले आणि छत्रपती संभाजीनगरातील पीटलाइनचे काम अजूनही सुरू आहे. या पीटलाइनच्या कामाला सुरूवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार? पीटलाइन कधी पूर्ण होणार आणि नव्या रेल्वे कधी मिळणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जालन्यात पीटलाइन झाल्याने नव्या रेल्वे सुरू करण्यासाठी जालन्यालाच प्राधान्यक्रम राहणार का? असाही सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
गेल्या ११ वर्षांत सुरू झालेल्या रेल्वे- नगरसोल - चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक)- नांदेड - मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस (दररोज)- मराठवाडा संपर्कक्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - तिरूपती एक्स्प्रेस (साप्ताहिक)- छत्रपती संभाजीनगर - नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- तिरूपती - शिर्डी एक्स्प्रेस (साप्ताहिक)- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस
या रेल्वेंची मागणी: १. छत्रपती संभाजीनगर-नागपूर (परभणी-हिंगोली-अकोला-बडनेरा-वर्धा मार्गे). २. छत्रपती संभाजीनगर-गोवा (मनमाड-कल्याण-पनवेल-पेण-चिपळूण-वैभववाडी मार्गे). ३. छत्रपती संभाजीनगर - मैसूर (परभणी-लातूर-पंढरपूर-बेळगाव-हुबळी-बंगळुरू मार्गे). ४. छत्रपती संभाजीनगर-राजकोट (मनमाड-जळगाव-सूरत-बडोदा-अहमदाबाद-सुरेंद्रनगरमार्गे) ५. छत्रपती संभाजीनगर-रायचूर-छत्रपती संभाजीनगर.
रेल्वे प्रवास करणे अवघडछत्रपती संभाजीनगरहून नागपूर, गोवा यासह विविध ठिकाणांसाठी रेल्वे सुरू झाली पाहिजे. अद्यापही छत्रपती संभाजीनगरहून लातूर, धाराशिव, पंढरपूर दरम्यान रेल्वे संपर्क नाहीत. सध्या उन्हाळी सुट्टीत सर्व गाड्यांना दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. देवगिरी, नंदीग्राम, पुणे, पनवेल आदी रेल्वेंत महिनाभरापूर्वीदेखील आरक्षण तिकीट उपलब्ध होत नाही. उन्हाळी सुट्टीत पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, बिकानेर, कन्याकुमारीपर्यंत जोडणारी नवीन रेल्वे चालविण्यात यावी.- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ