छत्रपती संभाजीनगर : शहराला ७५ एमएलडी वाढीव पाणी देण्याचे गाजर सहा महिन्यांपासून दाखविण्यात येत होते. प्रत्यक्षात भ्रमाचा भोपळा रविवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनच फुटला. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात फक्त २५ एमएलडी वाढीव पाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. एवढेच अतिरिक्त पाणी शहराला मिळेल. तेसुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. मनपाची जुनी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे बंद केली तरच शहराला ७५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक काेळी यांनी सांगितले.
२०० कोटी खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीद्वारे शहराला २४ तासात ७५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल, शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे स्वप्न १८ लाख नागरिकांना दाखविण्यात आले. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेने २० फेब्रुवारीला अतिरिक्त पाणी येईल, अशी घोषणा केली होती. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न- खरं सांगा, शहराला अतिरिक्त पाणी कधी आणि किती मिळेल?कोळी- ९०० मिमी जलवाहिनी टाकण्यासाठी टेंडर काढले तेव्हाच ठरले होते की, ७०० मिमीची जुनी जलवाहिनी बंद केली तरच ७५ एमएलडी पाणी मिळेल. ही जलवाहिनी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन जलवाहिनीतून तूर्त फक्त २५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल. कारण फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची सध्या क्षमता नाही.
प्रश्न- फारोळा येथील नवीन जलशुद्धीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल?कोळी- फारोळ्यात २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम २०० कोटीतच आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण होण्यास किमान जून महिना उजाडेल. हे केंद्र सुरू झाल्यावर शहराला ४० ते ४५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळू शकेल.
प्रश्न- ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्टिंग कधी पूर्ण होईल?कोळी- टेस्टिंगचे काम सुरू आहे. चार दिवसात पूर्ण होईल. पावसाळ्यात जलवाहिनी टाकली असल्याने दूषित पाणी जास्त येते. जलवाहिनी पूर्णपणे स्वच्छ करावी लागेल. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत टेस्टिंगला एक दिवस लागेल.
प्रश्न- ४ हजार अश्वशक्तीचे पंप कधी सुरू होतील?कोळी- ४ हजार अश्वशक्तीचे पंप बसविले. या पंपांचा वापर १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी करता येईल का, या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.