औरंगाबाद: मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस सोबत असल्याचे सांगून एका तरूणाचे अपहरण करून त्याच्याकडून ९८ हजार रुपये खंडणी उकळण्यात आल्याची खळबळजनक घटना १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते अदालत रोड दरम्यान घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी एका संशयितास अटक केली.
शेख मुश्ताक शेख मुनाफ(रा.रशीदपुरा,)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहमंद अश्फाक मोहंमद सिद्दीकी (२७,रा.शहाबाजार)हा फळविक्रीचा व्यवसाय करतो. १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तो कामानिमित्त गेला होता. तेथे त्याला आरोपी मुश्ताक भेटला आणि तो त्याच्या गळ्यात हात घालून एका कारकडे घेऊन गेला. कार जवळ जाताच आरोपीने मोहंमदला बळजबरीने कारमध्ये बसविले.
यावेळी गाडीत कारचालक आणि अन्य दोन जण आधीच बसलेले होते. आरोपींने त्यास नारेगावला घेऊन गेले. तेथून जिन्सी आणि नंतर अदालत रोडवर नेले. यावेळी त्याने कारमध्ये बसलेले अन्य तीन जण मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस आहेत. तू माझ्याविरोधात पोलिसांत जबाब नोंदविल्याने शिक्षा म्हणून दोन लाखाची खंडणी त्यांनी मागितली. पैसे दिले नाही तर मुंबईला घेऊन जाऊ असे धमकावले. यावेळी घाबरून गेलेल्या तक्रारदार यांनी त्याच्या खिशात व्यवसायाचे असलेले ६८ हजार रुपये आरोपींना दिले.
यानंतर त्यांनी तक्रारदारास त्याच्या भावाला फोन करायला लावून ३० हजार रुपये घेऊन निरालाबाजार येथे येण्याचे सांगितले. यावर तक्रारदाराच्या भावाने एटीएम मधून ३० हजार रुपये काढले आणि ते आरोपींना दिले. पैसे मिळताच आरोपींनी तरूणाची सुटका केली. सुटका होताच दोघे भाऊ घरी गेले. त्यांनी या घटनेची माहिती घरी सांगताच त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास उशीर झाला. १७ डिसेंबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी आरोपी मुश्ताकला अटक केली.