औरंगाबाद : सैन्य दलातील भरतीसाठी जेवणासह कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत; परंतु सौजन्य म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व नागरिकांच्या मदतीने अग्निवीर भरती सुविधापूर्ण वातावरणात पार पाडण्यात येत असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला. रात्री तापमान कमी असते, त्यामुळे भरतीची प्रक्रिया रात्रीतून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या दिवशी १३०० तरुणांची मैदान चाचणी घेण्यात आली. १६०० मीटर धावण्याची परीक्षा आहे. मोठ्या संख्येने तरुण आले आहेत. सेवाभावी संस्थांच्या मदतीने नाश्ता व फूड पॅकेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भरतीसाठी देशभरात कुठेही सुविधा दिल्या जात नाहीत. भरती प्रक्रिया कशी असते, हे सैन्यात जाण्यासाठी तयारी करणारांना माहिती असते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये चार संस्थांच्या मदतीने जे काही करता येईल, ते केले जात आहे. कर्नल प्रवीण कुमार, मेजर जनरल दिनेश उपाध्याय व पथक या प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहे.
मोठ्या प्रमाणात तरुण आल्यामुळे कुठेही लघुशंका, प्रात:विधी करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तरुणांच्या प्रात:विधीची अडचण होऊ नये, यासाठी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. तसेच सैन्य दलाच्या नियमानुसार शौचखड्डेदेखील करण्यात आले आहेत. तरुणांना चांगल्या प्रकारचे फूड दिले जात आहे, त्याची तपासणी प्रशासकीय यंत्रणेने केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
९ लाखांचे बजेट आहे भरतीसाठीअग्निवीर भरतीसाठी फक्त ९ लाख रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. हे बजेट वाढवून मागण्यात येणार आहे. सीएसआरमधून इतर खर्च केला जात आहे. नागरिकदेखील प्रशासनाला मदत करीत आहेत. २२ दिवस प्रक्रिया चालणार आहे. ७६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. १८ ते २३ वर्षांत पाच वेळा तरुणांना भरतीसाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे तरुणांनी निराश होऊ नये, आगामी काळात पुन्हा संधी उपलब्ध होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.