छत्रपती संभाजीनगर : शहरातून वाळूजच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचा मध्यरात्री डोळा लागला आणि फोम गाद्यांचा टेम्पो थेट लोखंडी पुलावरून खाली कोसळला. तेथील बॅनरच्या लोखंडी अँगलला टेम्पोची जाळी अडकल्याने मात्र चालकाचा जीव वाचला. पोलिसांनी धाव घेत त्याला वर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले.
टेम्पो चालक (एम पी ०४ जीएच २२७४) फोम गाद्या घेऊन मध्यरात्री २:१५ वाजता वाळूजच्या दिशेने निघाला होता. महावीर चौक ओलांडताच लाेखंडी पुलाच्या अलीकडे मात्र टेम्पो चालकाचा स्टिअरिंग वरचा ताबा सुटला आणि तो थेट पुलाच्या खाली गेला. टेम्पोच्या जाळीचा भाग तेथील बॅनरच्या लोखंडी अँगलमध्ये अडकल्याने तो खोलवर जाऊन आदळण्यापासून वाचला. कर्णपुऱ्यातील बंदोबस्त संपवून ठाण्यात चाललेले छावणीचे निरीक्षक दिलीप ठाकूर, उपनिरीक्षक विकास खटके यांनी तत्काळ तेथे धाव घेतली.
चालक लटकलेल्या अवस्थेतटेम्पो खाली जाताच मोठा आवाज झाला. चालक घाबरून गेला होता. टेम्पो अडकल्याने मात्र त्याचा जीव वाचला. पोलिसांनी त्याला स्थानिकांच्या मदतीने वर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. डुलकी लागल्यानेच त्याचा तोल गेल्याचे उपनिरीक्षक विकास खटक यांनी सांगितले.