औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरिआॅनचा मुद्दा गाजत आहे. यासाठी विद्यापीठाने तात्काळ व्यवस्थापन परिषदेची बैठक घेत कॅरिआॅन न देण्यावर शिक्कामोर्तब के ले. मात्र, विद्यार्थ्यांच्या सततच्या आंदोलनामुळे तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्यावर्षी लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.
विद्यापीठाशी संलग्न नऊ महाविद्यालये लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाली आहेत. या महाविद्यालयांतील तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांतील विद्यार्थीच औरंगाबादच्या विद्यापीठाशी संलग्न आहेत. मागील वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लेखी हमीच्या आधारावर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना १८ आॅगस्ट २०१७ रोजी कॅरिआॅन देण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षापर्यंत हा नियम लागू आहे.
यामुळे केवळ तिसऱ्या वर्षात एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षात प्रवेश देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, या विद्यार्थ्यांनी कॅ रिआॅन न देता केवळ लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्याची मागणी केली, तसेच पुढील वर्षापासून चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम लागू होणार असल्यामुळे तीन विषय अतिरिक्त राहणार असल्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. डॉ. तेजनकर यांनी चार अधिष्ठाता आणि परीक्षा संचालक, अधिकाऱ्यांना संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या लेखी हमीच्या आधारावर तात्पुरता प्रवेश देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले. नियम बनविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
...असे असणार नियमअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिलेली आहे. मात्र, त्यांचे द्वितीय आणि तृतीय वर्षांतील काही विषय ‘बॅक’ राहिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी तात्पुरता प्रवेश दिला जाईल. या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत मागील दोन्ही वर्षांचे सर्व विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. याशिवाय चौथ्या वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षाही नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये देता येणार नाही. दोन्ही सत्रांची परीक्षा मे/जून २०१९ मध्ये द्यावी लागणार आहे. जर विद्यार्थी डिसेंबरच्या परीक्षेत मागील विषय उत्तीर्ण झाला नाही, तर त्याचा प्रवेश रद्द समजण्यात येईल. तशा पद्धतीची लेखी हमी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.