वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेवून सिडको प्रशासनाने वाळूज महानगर १ ते म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कामाला अखेर शुक्रवारी सुरुवात केली. नऊ ते दहा महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांची गैरसोय दूर होणार असून, वाहतुकीची कोंडी सुटण्यासही मदत होणार आहे.
सिडको प्रशासनाने गतवर्षी जुलै महिन्यात महानगर १ मधून म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाºया रस्त्याचे काम हाती घेतले होते. हा रस्ता तीसगाव हद्दीतील नाल्यावरुन जात असल्याने व नाल्यात कायम पाणी थांबत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात नाल्यावर सिमेंट नळ्या टाकून पूल उभारला. पण पहिल्याच पावसात अर्धा पूल वाहून गेला. पूलाच्या दोन्ही बाजूने डांबरीकरण केले होते. मात्र, पुलाचे काम रखडले होते. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा सिडकोकडे अर्ज, विनंत्या करुन पुलाचे काम करण्याची मागणी केली. पुलाचे काम रखडल्याने वाहनधारकांना एएस क्लबला वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत होते.
लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या सिडको प्रशासनाने पूल उभारणीसंदर्भात हालचाली सुरु केल्या. शुक्रवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील जुन्या पुलाचे साहित्य बाजूला काढले जात असून, त्या ठिकाणी नवीन सिमेंट नळ्या, मुरुम, वाळू टाकण्याचे काम सुरु केले आहे. या पुलाचे काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. यायंदर्भात सिडकोचे उप अभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता यावी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात पुलाचे काम केले जात आहे, असे सांगितले.