छत्रपती संभाजीनगर : शोरूम मालकाला एका क्लिकवर पैसे कमावण्याचा मोह चांगलाच महागात पडला. सायबर गुन्हेगाराने विश्वास कमावण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस कमिशन देऊ केले. परंतु, नंतर कर, विम्यासारखी विविध कारणे सांगून तब्बल ५४ लाख २२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. दोनच महिन्यांत व्यावसायिकाने ही सर्व रक्कम गमावली, हे विशेष.
उच्चशिक्षित असलेले राजू मुत्तलवाड (४३) हे कुटुंबासह नंदवन कॉलनीत राहतात. त्यांचे वाळूजला ट्रॅक्टरचे शोरूम आहे. एप्रिल, २०२३ मध्ये त्यांना टेलिग्रामवर पूजा गुप्ता नामक तरुणीने पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज केला होता. अधिक माहिती घेतल्यावर तिने त्यांना ट्रिप ॲडव्हायझर या संकेतस्थळावर हॉटेलला रेटिंग द्यायचे. त्यासाठी तुम्हाला कमिशन मिळेल, असे आश्वासन दिले. मुत्तलवाड यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम सुरू केले. आरोपींनीदेखील त्यांना दहा दिवस हजारो रुपयांचा परतावा देत विश्वास जिंकला. परंतु, आता तुमची लेव्हल वाढली आहे, आता वरिष्ठ संपर्क करतील, असे म्हणत हिमांशू शर्मा, राहुल शर्मा, रितेश देशपांडे, सोनाली, दृष्टी टोपवाल यांची नावे दिली.
नव्या व्यक्तींनी त्यांना विविध कारणे देऊन पैसे पाठविण्यास सांगितले. परतावा मिळालेला असल्याने मुत्तलवाड पैसे देत गेले. त्यांना टेलिग्रामवर ट्रॅव्हलर्स चॉईस नावाच्या ग्रुपमध्ये ॲड केले. त्यात इतर सदस्यांना मिळणाऱ्या कमिशनचे स्क्रिनशॉट टाकून मुत्तलवाड यांना जाळ्यात अडकविण्यात आरोपी यशस्वी ठरले. असे करत मुत्तलवाड यांच्याकडून अवघ्या दोन महिन्यांमध्ये ५४ लाख २२ हजार रुपये उकळले. या दरम्यान त्यांना एकही रुपयांचा परतावा मिळाला नाही. २५ मे राेजी पुन्हा त्यांना कॉल प्राप्त झाला. आठ लेव्हल पूर्ण केल्या की तुम्हाला तुमचे सर्व ५४ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. तेव्हा मात्र मुत्तलवाड यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी मुत्तलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या फसवणुकीतील रक्कम अधिक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास वर्ग होणार असल्याचे देशमाने यांनी स्पष्ट केले.