सोयगाव येथील खासगी रुग्णालये फुल्ल झाले असून, जरंडीच्या कोविड केंद्रातही दहाच बेड शिल्लक असल्याने प्रशासन जागे झाले आहे. मंगळवारी तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी जरंडी आणि निंबायतीच्या कोविड केंद्राला भेटी देऊन सुविधांचा आढावा घेतला. निंबायती कोविड केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोयगाव तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट वाढू लागला आहे. मंगळवारी थेट अकरा रुग्ण सकारात्मक आढळले आहेत. नागरिकांचा निष्काळजीपणा याला मुख्य कारणीभूत ठरू लागला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने सोयगावकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर
जरंडी कोविड केंद्राला जरंडी गावातून विजेचा पुरवठा करण्यात आला आहे; परंतु या वीज उपकेंद्रातून अवेळी वीज पुरवठा तासन्तास खंडित होत असल्याने सोमवारी रात्री तासभर रुग्ण अंधारात होते. याकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप थेट रुग्णांनी केला आहे.
छायाचित्र ओळ - जरंडी कोविड केंद्रांची पाहणी करताना अधिकारी