दुधड : औरंगाबाद तालुक्यातील दुधड येथील दोन उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी शेतीव्यतिरिक्त वेगळा मत्स्यपालनाचा वेगळा प्रयोग करून प्रत्येकी दहा लाखांचे उत्पन्न काढले आहे. ही किमया त्यांनी केवळ आठ महिन्यांतच केल्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.
पारंपरिक शेतीमध्ये शेतकऱ्यांचे सर्व उत्पन्न अस्मानी व सुलतानी या दोन्हींच्या लहरीपणावर अवलंबून असते. यावर मात करीत अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे भर देत आहेत. दूधड येथील शेतकरी भागाजी राऊत यांनी आपल्या गट क्र. ७२ मध्ये दहा वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या साहाय्याने २० गुंठे जमिनित शेततळे तयार करून त्यात ३० हजार मत्स्यबीजे सोडली होती. मात्र, संगाेपनाचे तंत्र माहिती नसल्याने त्यावेळी त्यांचा हा प्रयोग फसला होता. यानंतर त्यांचा उच्चशिक्षित सीए असलेला मुलगा सूरज व गावातील इंजिनिअरिंग झालेल्या साईनाथ चौधरी या दोघा तरुणांनी पूर्ण अभ्यासांती हा प्रयोग राबविणे सुरू केले आहे. यंदा या दोघांना आठ महिन्यांत प्रत्येकी दहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
चौकट
प्लॅस्टिक अच्छादनामुळे प्रयोग फसला
सूरज राऊत या शेतकऱ्याचे शेततळे प्लास्टिक पन्नी टाकलेले होते, तेव्हा मत्स्यबीज जगण्याचे प्रमाण नगण्य होते. नंतर त्यांच्या लक्षात आले की, मातीच्या तळ्यामध्ये मत्स्यबीजे कमी मरतात. मातीमुळे पाण्यामधील ऑक्सिजन, अमोनिया आणि पीएच या घटकांचा समतोल राहतो. प्लास्टिक अच्छादनामुळे पाण्यातील महत्त्वाचे घटक कमी-जास्त होत होते, यामुळे त्यांनी पाण्याची तपासणी करून वेळोवेळी विविध उपाय करून या घटकांचा समतोल साधला.
कोट
माझ्या शेतातील शेततळ्यामध्ये साधारण दहा टनांपर्यंत मत्स्यांचे उत्पन्न निघत आहे. या माशाला बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. मत्स्य व्यापारी शेतात येऊन जागेवरच मासे खरेदी करून नेत आहेत. हा व्यवसाय करताना सुरुवातीला याबाबत बारकाईने अभ्यास केला. घरगुती खाद्य न वापरता मत्स्यांच्या वजनानुसार पाण्यात तरंगणारे प्रोटीनयुक्त खाद्य देण्यात येते.
सूरज भागाजी राऊत, शेतकरी
चौकट
चार शेततळ्यात मत्स्यपालन
सध्या सूरज राऊत व साईनाथ चौधरी हे दोघेही प्रत्येकी दोन शेततळ्यांत मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात. रूपचंद, पंकज, चिलापी, कटला आणि सायपरणस अशा विविध जातींचे मत्स्यांचे उत्पादन ते काढतात. या मत्स्य व्यवसायाला जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, जिल्हा गुण नियंत्रक अधीक्षक आशिष काळुसे तसेच अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
कोट
इंजिनिअरिंग करत असताना आंध्र प्रदेशचा एक मित्र सोबत होता. त्याच्या घरी पारंपरिक मत्स्यशेती केली जात होती. त्यामुळे मत्स्यशेती करायचे ठरवले. त्याच्या घरी एक महिना वास्तव्यास जाऊन तेथील मत्स्यशेतीचे प्रात्यक्षिक बघितले. तेथील अनुभव आजरोजी उपयोगी पडत आहे.
साईनाथ भिका चौधरी, शेतकरी
फोटो : सूरज राऊत यांच्या शेततळ्यात सुरू असलेला मत्स्यपालन व्यवसाय.