छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत २७७ पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रक्रियाही सुरू केली. राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश २७ फेब्रुवारीला काढला. त्यामुळे महापालिकेला भरती प्रक्रियेत १० टक्क्यांची तरतूद करावी लागेल. त्यासाठी आरक्षणाचा मसुदा नव्याने तयार करावा लागणार आहे. भरती प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलावी लागेल, असे सूत्रांनी नमूद केले.
शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात ११४ पदांची भरती करण्यात आली. आयबीपीएस कंपनीमार्फत भरती केली. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मनपातील २८६ रिक्त पदांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला. शासनाने मंजुरी दिली. २८६ पैकी ९ रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात आली. उर्वरीत २७७ रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू केली. जाहिरातीचा मसुदा आयबीपीएस कंपनीला सादर केला. लवकरच जाहिरातसुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यातच २७ फेब्रुवारीला शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेला अध्यादेशही प्राप्त झाला. त्यामुळे भरती प्रक्रिया तूर्त पुढे ढकलण्यात आली.
नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबविणारउपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय झाला. भरतीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू करावे लागणार आहे. नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच जाहिरातीचा मसुदा अंतिम केला जाईल. या प्रक्रियेस साधारणपणे दीड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.