औरंगाबाद : देशविरोधी कारवाया करीत असल्यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पदाधिकाऱ्यांवर तपास यंत्रणांनी अटकेची कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) शहर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करीत ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’च्या १४ पदाधिकाऱ्यांना घरातून ताब्यात घेतले. या सर्वांची आयबीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर कलम १५१ (३) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.
शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये माेहम्मद साबेर अब्दुल खालेद (३५, रा. ग.नं.११, संजयनगर), मुनीर अहमद सलील अहमद (३४, रा. मुजीब कॉलनी, रोशनगेट), शफीउल्ला खान अफरुल्लाखान (३१, रा. ग.नं. ६, रहिमानिया कॉलनी), मोहम्मद मोसीन मोहम्मद इसाक (३४, रा. ग.नं. ३, किराडपुरा) या चार जणांवर आयपीसी कलम १५१(३) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत जिन्सी पोलिसांनी अटक केली. या चौघांना प्रथमवर्ग न्या. एस.पी. बेदरकर यांच्या समोर हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. अमेर काझी यांनी आरोपींनी देशविरोधी कारवाया करणाऱ्या ‘पीएफआय’च्या संबंधिता चार जणांना अटक केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ आंदोलन करीत घोषणाबाजी केल्याचे सांगितले. त्यात केंद्र शासन, एटीएसच्या विरोधात घोषणा दिल्या. तर ‘पीएफआय’ समर्थनार्थ घोषणाबाजी करीत शहरात दंगल करण्याच्या उद्देशाने आंदोलन केल्यामुळे संबंधितांना प्रतिबंधात्मक कारवाईत १५ दिवस स्थानबद्ध करण्याची गरज असल्याचे असल्याचे सांगितले. त्यावर आरोपीचे वकील ॲड. खिजर पटेल यांनी आक्षेप नोंदवला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चार जणांना ६ ऑक्टोबरपर्यंत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यास मंजुरी दिली.
दहाजणांना बॉण्डवर सोडलेकोम्बिंग ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या चारजणांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित मलिक झबी उर-रहमान मोहम्मद इद्रीस (रा. हर्सूल), अताउर रहमान अब्बास पटेल, सय्यद कलीम कलामभाई छोटे, सय्यद मोहम्मद इम्रान मयदू शहा, मोहम्मद जुबेर मोहम्मद सादिक ऊर्फ जुबेर पहिलवान, समद अस्लम शेख, अस्लम हसन शेख, सय्यद फयाज सय्यद रजीओद्दीन, मोहम्मद मोसीन नदवी आणि समीर शेख समीर पटेल यांच्यावर आयपीसी कलम १०७ अंतर्गत बॉण्ड लिहून घेत सहायक पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.