दिल्लीगेट परिसरातील सलीम अली सरोवरातील मासे मेल्याची घटना रविवारी समोर आली. ही माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सोमवारीदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सरोवराची पाहणी केली. सरोवरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले तर मृत माशांचे नमुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप त्याचा अहवाल आला नाही.
पालिकेने अग्निशमन विभागाच्या मदतीने सरोवरातील मेलेले मासे बाहेर काढण्याचे काम बुधवारी सुरू केले. या कामासाठी अग्निशमन विभागाची एक बोट आणि काही कर्मचारी सकाळपासून तैनात केले. कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आठ ते दहा क्विटंल मासे बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरोवरातून बाहेर काढलेले मासे पोत्यांमध्ये भरून नंतर नष्ट करण्यात आले. सरोवरातील पाण्यात कोणीतरी विष कालवले असेल असा अंदाजही महापालिकेकडून वर्तविण्यात येत आहे.