स्वच्छतेकडे अधिक लक्ष : मागील वर्षभरात २५ टक्क्याने वाढली विक्री
औरंगाबाद : मागील वर्षभरात तेही कोरोना काळात शहरात झाडूची विक्री तब्बल २० ते २५ टक्क्याने वाढली. शहरात दररोज दहा हजार नग झाडू विकले जातात, हे वाचून आपणास आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे. लोक
स्वच्छतेबद्दल जागरूक झाले आहेत. यात वैयक्तिक स्वच्छतेबरोबर घरातील स्वच्छतेवर तेवढाच भर दिला जात आहे. यामुळे मागील वर्षभरात शहरात झाडूची विक्री वाढल्याचे वितरकांनी सांगितले.
कोविड-१९ मध्ये ग्राहकांनी झाडूला देखील चर्चेत आणले आहे. लॉकडाऊनमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य जास्त वेळ घरात घालवत आहेत. यामुळे कचरा जास्त प्रमाणात निघत आहे. चकचकीत स्टाईल्सवर कचरा, धूळ लगेच दिसून येते. वर्षभराआधी जेथे घर दोनदा झाडून घेतले जात होते, तेथे आता चारदा झाडून घ्यावे लागते आहे. अनेक घरांमध्ये पूर्वी मोलकरणी झाडून घेत असत; पण कोरोनामुळे अनेकांनी मोलकरणींना कामावरून काढून टाकले. यामुळे स्वतःच घरातली साफसफाई केली जात आहे. यासाठी चांगला झाडू खरेदी केला जात आहे. कोरोनाच्या आधी दररोज ७००० ते ७५०० झाडू विकले जात होते. आता दहा हजार झाडू विकले जात असल्याचे वितरकांनी नमूद केले.
चौकट
सिंथेटिक झाडूला पसंती
ओडिसा, आसाम येथे टायगर ग्रास उगविला जातो. याच गवताचे झाडू तयार केले जातात. शहरात ८ कारखान्यांत असा झाडू तयार होतो, तर ब्रँडेड कंपन्या सिंथेटिक (प्लास्टिक) झाडू तयार करत आहेत. मागील वर्षभरात झाडूला २५ टक्क्याने मागणी वाढली असून, त्यात सिंथेटिक झाडूची मागणी १५ टक्क्याने वाढली आहे.
संजय लोहाडे
ज्येष्ठ व्यापारी
---
कंपन्या करताहेत झाडूवर संशोधन
नैसर्गिक गवताच्या झाडूचा भुसा पडतो. यामुळे ग्राहक आता सिंथेटिक झाडूला पसंत करत आहेत. यातही आता छताचे जाळे काढण्यासाठी झाडूच्या दांडीचा आकार लहान- मोठा करता येईल असे झाडू बाजारात आले आहेत. फोल्ड करता येतील असे झाडू येत्या काळात बाजारात येणार आहेत. आता एक ब्रँडेड कंपनी इको फ्रेंडली झाडू बनवत आहे, ज्यात प्लास्टिकचा वापर नसेल तसेच झाडूसाठी वापरण्यात येणारे गवत जास्त दिवस कसे टिकेल, यावर संशोधन सुरू आहे.
मनीष साबू
वितरक