औरंगाबाद : शहरात काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. दिव्यांग, गतिमंद असलेल्या सुमारे १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्याकरिता प्रत्येक झोनमधील एका केंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे. तसेच कोविन अॅपमध्ये स्वतंत्र साइट तयार करून त्यामध्ये नोंदणी केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोमवारी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. यामध्ये ६० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या शिबिरामुळे शहरातील इतर दिव्यांग बांधवांना स्वतंत्रपणे लसीकरण देण्याची संकल्पना समोर आली. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने मंगळवारी निर्णय घेतला. महापालिकेमध्ये ३ हजार ५२६ दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे. तसेच नोंदणी न केलेले देखील सुमारे ७ हजार दिव्यांग, गतिमंद नागरिक शहरात आहेत. त्यांचेही लसीकरण देखील महत्त्वाचे आहे. त्याकरिता ९ झोन कार्यालयांना प्रत्येकी एका केंद्रावर व्यवस्था करण्याची सूचना करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांच्या लसीकरणाची तारीख लवकरच मनपाकडून जाहीर करण्यात येईल.
बेघर नागरिकांचे सर्वेक्षण
रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यांना ही विशेष मोहीम राबवून लसीकरण करण्यात येणार आहे.