वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगरात वृक्षमित्र पोपट रसाळ यांनी सुरु केलेल्या हरितक्रांतीला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी मिळून स्थापन केलेल्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन परिवाराच्या माध्यमातून परिसरात वेगवेगळ्या जातीच्या १० हजारांपेक्षा अधिक वृक्षाची लागवड करुन संवर्धन केले जात आहे. या लोकसहभागातून सिडकोचा परिसर हिरवागार होत असल्याचे सुखद चित्र पहावयास मिळत आहे.
सिडको वाळूज महानगरात २०१५ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षमित्र पोपट रसाळ यांनी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली. त्यांनी सुरुवातील सिडको प्रशासनाच्या मदतीने परिसरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करुन संवर्धन केले.
दरम्यान, या अभियानाला लोक जोडले गेल्याने व्यापक स्वरुप प्राप्त झाले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन परिवार स्थापन करुन ही चळवळ अधिक गतिमान करण्यात आली. सिडको परिसरात आत्तापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक विविध जातींच्या वृक्षाची लागवड केली आहे.
या परिवाराची व्याप्ती वाढत असून १ लाख वृक्ष लागवडीचा परिवाराचा संकल्प आहे. या मोहिमेपासून प्रेरणा घेवून परिसरातील अनेक भागात वृक्ष लागवड केली जात आहे. हे या चळवळीचे मोठे यश म्हणावे लागेल.