लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील दूषित पाणी पिणाऱ्या १० गावांतील नागरिकांना आता शुद्ध पाणी मिळणार असून यासाठी ४८ लाख ८६ हजार रूपये खर्च होणार आहेत़ जलस्वराज- २ व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील टंचाई कालावधीसाठी साठवण टाक्या उभारणीचे प्रकल्प, पाणी गुणवत्ता बाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र (आरओ) उभारणीच्या १७ गावांतील प्रकल्पाच्या भूमिपूजनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता या कामांना सुरूवात करण्यात आली आहे़ जलस्वराज प्रकल्प टप्पा- २ अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाणी तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे, पाणी गुणवत्ता विषयक सनियंत्रण माहिती प्रणाली तयार करणे, पाणी गुणवत्ता बाधित गावांत उपाययोजना करणे, संवाद व क्षमताबांधणी उपक्रम करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत़ तसेच लोकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यााबत तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती वाढविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील किनवट, माहूर, धर्माबाद, मुखेड व लोहा तालुक्यातील अनेक गावे दूषित पाणी बाधित आहेत़ तर अनेक वस्ती, तांड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सहायाने सोडविण्यात येणार आहे़ पाणी गुणवत्ता बाधित गावांपैकी किनवट तालुक्यातील- दूधगाव, येंदा, शनिवारपेठ, सिरमेटी, देगलूर- मुजळगा, धमार्बाद- रामपूर, रामेश्वर, बिलोली- कोळगाव व माहूर तालुक्यातील अंजनखेड, वाई, पाणीटंचाईग्रस्त ५ गावे - किनवट तालुक्यातील- आमरसिंग नाईक तांडा, मुखेड- -फत्तुतांडा, मानसिंग तांडा, व लोहा- चित्रातांडा, सोनमांजरीतांडा या गावांत पाणी शुद्धीकरण संयंत्र उभारण्यात येणार आहेत़ टंचाईग्रस्त गावांपैकी किनवट तालुक्यातील आमरसिंग नाईकतांडा, मुखेड तालुक्यात किशन तांडा, फत्तुतांडा, मानसिंगतांडा, वाल्मिकवाडी, विठ्ठलवाडी, सिद्धनाथ, लोहा तालुक्यात आम्रतातांडा, उमला तांडा, चित्रातांडा, थावरातांडा, परसरामतांडा, सोनमांजरीतांडा या तेरा गावांत साठवण टाक्या बसविण्यात येणार आहेत़ दूषित पाणी पिणाऱ्या गावांत पाणी शुद्धीकरण संयंत्र बसविण्यासाठी ४८ लाख ८६ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहेत़ यामध्ये रामपूर व रामेश्वरसाठी ३ लाख ९ हजार , कोळगाव-४ लाख २ हजार, सिरमेटी-५ लाख ७ हजार, अंजनखेड- ६ लाख १ हजाऱ मुजळगा- ४ लाख ८ हजार, येंदा -४ लाख २ हजार, दूधगाव- ४ लाख २ हजार, शनिवारपेठ- ५ लाख ७ हजार, वाई- ६ लाख १ हजाऱ जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्यावतीने ही कामे केली जाणार आहेत़
जिल्ह्यात दहा गावांना मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:13 AM