चंद्रकांत देवणे /वसमत
विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना ५५५६ मतांनी पराभूत केले. भाजपचे उमदेवार अँड. शिवाजी जाधव यांनीही जोरदार मुसंडी मारल्यामुळे दांडेगावकरांना हाबाडा बसला.
वसमत विधानसभा मतदारसंघ दोन जयप्रकाशांच्या लढतीसाठी प्रसिध्द आहे. दोहोंपैकी एक विजयी होतो, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु यावेळी युती व आघाडी तुटल्याने चौरंगी सामना झाला. भाजपकडून सुप्रीम कोर्टाचे विधीज्ञ अँड. शिवाजी जाधव तर काँग्रेस कडून माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान हे दोन नवे चेहरे मैदानात उतरले व मुकाबला रंगला. शहरात हमखास लिड मिळवणार्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या अ. हफीज यांच्यामुळे घाम फुटला तर ग्रामीण भागात जोरात असलेल्या सेनेच्या गटात जाधव यांनी खिंडार पाडले होते. असे असले तरी अंतिम संघर्ष मात्र दोन जयप्रकाशांतच झाल्याचे चित्र निकालाअंती समोर आले.
शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना ६३ हजार ८५१, राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांना ५८ हजार २९५, भाजपाचे अँड. शिवाजी जाधव यांना ५१ हजार १९७ तर काँग्रेसच्या अ. हफीज अ. रहेमान यांना १३ हजार ३२५ मते मिळाली. ५ हजार ५५६ एवढय़ा मताधिक्याने डॉ. मुंदडा यांचा विजय झाला. अत्यंत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांच्या जोरावर डॉ. मुंदडा यांनी हा विजय खेचून आणला आहे. वसमतवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे. (वार्ताहर)
कार्यकर्ता जोपासला
मागील दहा वर्षांपासून डॉ. जयप्रकाश मुंदडा हे सत्तेत नाहीत. मात्र तरीही त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. मंत्री राहिलेले असूनही सामान्य कार्यकर्त्यांशीही जवळीकता कायम ठेवली. त्यामुळे जि.प., पं.स., न.प. अशा संस्थांवर वरचष्मा राहिला. कार्यकर्त्यांना सत्तापदे मिळाली. त्यामुळे दोनवेळा निसटता पराभव झालेले मुंदडा यावेळी त्याच बळावर बाजी मारून गेले. प्रचारही घरोघर जावून केला.