औरंगाबाद : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सात महिने अत्याचार करणारा सदाशिव ऊर्फ शिवा बाळा पुरी याला विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथे राहणारा सदाशिव ऊर्फ शिवा बाळा पुरी याची भाजी विकणाºया १५ वर्षांच्या मुलीसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सदाशिवने सदर मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्या आई-वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती.पोलिसांनी सदाशिवला २१ सप्टेंबर २०१५ रोजी उत्तर प्रदेशातील नॉयडा शहरातून आणले. त्यावेळी पीडिता गर्भवती होती. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात सदाशिव पुरी (२७, रा. कांचनवाडी), मंदाबाई दीपक चव्हाण (२७), रा. जुना मोंढा, बाळू राजाराम पुरी (५०, रा. गोपेवाडी, ता. प्ौठण) आणि विकास रामनाथ शिंदे या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पीडितेची आई तथा फिर्यादी सुनावणीच्या वेळी फितूर झाली. वैद्यकीय अधिकारी आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला ‘डीएनए’चा अहवाल महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने सदाशिवला दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीला ‘बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार १० वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. पोक्सो अधिनियम ३ नुसार ७ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. मंदाबाई चव्हाण, बाळू पुरी आणि विकास शिंदे या तिघांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने दोषमुक्त केले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:56 PM