शेतकऱ्यांनी पाच ते सहा हजार रुपये किलो दराने कांद्याचे बियाणे खरेदी करुन मोठ्या प्रमाणात कांद्याची रोपे तयार केली आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असूनही कांद्याची विक्रमी लागवड झाली होती. तसेच पीकही चांगले आले होते. मात्र, सुरुवातीला कांदा मातीमोल भावाने विकावा लागला. त्याचा भाव सातशे-आठशे रुपये प्रतिक्विंटल होता. नंतर कांद्याला आणखी भाव म्हणजे चार ते पाच हजार रुपये भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. सध्या कांद्याचे भाव कमी झाले असले तरीही यावर्षी कांदा लागवडीत लक्षणीय वाढ होणार आहे.
खताच्या दरात वाढ, लागवडीचा खर्चही वाढला
खताच्या दरवाढीबरोबर कांदा लागवडीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. गेल्यावर्षी कांदा लागवडीसाठी प्रतिएकर सहा ते सात हजार खर्च लागायचा. आता हा खर्च नऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यंदा कांद्याला भाव येईल किंवा नाही, याचा अचूक अंदाज नसला तरीही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे विक्रमी उत्पन्न होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.