औरंगाबाद : शहरात व आसपासच्या भागात बिझनेस सेंटर उभारले जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे मागील वर्षभराच्या काळात या सेंटरमधील बहुतांश गाळे बुक झाले आहेत. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गाळे हे ४५ च्या आतील तरुणांनी खरेदी केले आहेत.
तरुणमंडळी आता नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय, सेवा उद्योग सुरू करण्याला जास्त पसंती देत असल्याचे यावरून लक्षात येत आहे. यासंदर्भात वंश ग्रुपचे संचालक विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीवर आहेत त्यांच्या पगारात कपात झाली. अनेक व्यवसाय, उद्योगांचे नुकसान झाले. मात्र, ज्यांच्याकडे स्वतःची व्यावसायिक प्रॉपर्टी आहे ते तग धरून राहिले. याचा सकारात्मक परिणाम तरुण पिढीवर झाला. नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे त्यांचा कल वाढला. त्यासाठी भाडे भरण्यापेक्षा आधी एक व्यावसायिक गाळा खरेदी करावा व व्यवसायाला सुरुवात करावी. भाडे भरण्याऐवजी बँकेचा ईएमआय भरावा या विचाराला आता प्राधान्य दिले जात आहे. यामुळे अवघ्या ५ लाखांपासून ते १५ लाखांदरम्यानचे व्यावसायिक गाळे खरेदी केले जात आहेत. कोणाचा मुलगा इंजिनीअर झाला, कोणाचा मुलगा डॉक्टर आहे, कोणाचा मुलगा आयआयटी झाला, कोणी एमबीए झाले अशांचे वडील आता निवृत्त झाले किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना एकरकमी पेन्शन, पीएफ मिळणार आहे. असे पालक आपल्या मुलांना व्यावसायिक गाळे खरेदीसाठी अर्थसाह्य करीत आहेत. यामुळे शहरात बिझनेस सेंटरला मागणी वाढत आहे. अशा बिझनेस सेंटरमध्ये नवव्यावसायिकांच्या गरजा ओळखून त्यात वाय-फाय सुविधा, तांत्रिक सुरक्षा कवच दिले जात आहे. यात सीसीटीव्ही कॅमेरा, सेक्युरिटी कॅबिन आदी व्यवस्था पुरविल्या जात आहेत. शहरात विशेषतः चिकलठाणा, जालनारोड, कुंभेफळ, शेंद्रा, वाळूज, पंढरपूर, बिडकीन, बीडबायपास, स्टेशनरोड तसेच शहरातही बिझनेस सेंटर उभारले जात आहेत. येत्या वर्षभरात आणखी बिझनेस सेंटर उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचे नियोजन सुरू आहे.
चौकट
व्यवसायाच्या विस्तारासाठी
व्यापाऱ्यांचा दुसरा वर्ग असा आहे की, ते येथील उद्योगांना दैनंदिन लागणाऱ्या औद्योगिक वस्तू, अन्य सामग्री, साहित्य पुरविण्याचे काम करतात. त्यांना इंडस्ट्रीयल सप्लायर्स असे म्हणतात. डीएमआयसीमुळे मोठे उद्योग शेंद्रा, बिडकीन औद्योगिक वसाहतीत येणार आहेत. यामुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी इंडस्ट्रीयल सप्लायर्स सक्रिय झाले आहेत. हा वर्गही आता बिझनेस सेंटरकडे वळत आहे. अनेकांना आपल्या कंपनीच्या ब्रँच सुरू करायच्या आहेत. तेसुद्धा बिझनेस सेंटरलाच प्राधान्य देत आहेत.