लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एटूझेडचे काम बंद केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे मनपाची इभ्रत कचऱ्यात गेली असताना, आता पुन्हा नव्याने कचरा उचलण्यासाठी मनपाने निविदा काढल्या आहेत़ यापूर्वी पाच वेळेस कचऱ्याच्या निविदा काढूनही एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नव्हता हे विशेष़कचरा उचलण्याचे काम सुरुवातीला अँथोनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते़ कचऱ्याच्या वजनाप्रमाणे अँथोनीला मनपाकडून रक्कम अदा केली जात होती़ महिन्याकाठी अशाप्रकारे जवळपास ८० लाख ते १ कोटीपर्यंतची रक्कम मनपाला संबंधित कंत्राटदाराला द्यावी लागत होती़ या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे खत प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली होती़ त्यासाठी कोट्यवधींचा निधीही खर्च करण्यात आला, परंतु हा प्रकल्प सुरु झालाच नाही़ त्यात कचरा कंत्राटदाराकडून मापात पाप करण्याच्याही अनेक बाबी उघडकीस आल्या़ त्यानंतर दुसऱ्या वेळेत कचऱ्याचे कंत्राट एटूझेड या कंपनीला देण्यात आले़ परंतु सुरुवातीपासून या कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरला होता़ मनपाने अनेकवेळा या कंपनीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला़ त्यात कधी कंपनीने काही नगरसेवकांना हाताशी धरुन दंडातून अनेकवेळा सूटही मिळविली़ महासभेत कचऱ्याच्या प्रश्नावरुन आकांडतांडव करणारे नगरसेवक बाहेर निघताच, कंत्राटदाराच्या गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे दृश्यही मनपात पहावयास मिळाले़ परंतु दोन महिन्यापूर्वी एटूझेडचे काम बंद करण्यात आले़ कंपनीकडून मजूरांचे वेतनही देण्यात आले नाही़ त्यावरुन बराच गोंधळ झाला़ त्यानंतर मनपाने कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच न केल्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट बनली़ जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले होते़ तत्पूर्वी मनपाने कचऱ्यासाठी चार वेळेस काढलेल्या निविदांनाही प्रतिसाद मिळाला नाही़ कचरा संकलित करुन तो तुप्पा येथील खत प्रकल्पात पोहोचविल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याबाबत या निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यामुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ आता पुन्हा एकदा मनपाने निविदा काढल्या आहेत़ त्यामध्ये घरोघरी जावून कचरा संकलित करुन तो खत प्रकल्पापर्यंत पोहोचवा, असे त्यात नमूद आहे़ त्यामुळे यावेळेस तरी, कचऱ्यासाठी कंत्राटदार पुढे येतील अशी अपेक्षा आहे़ दरम्यान, शहरातील कचरा उचलण्याचे काम मनपाचे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केले जात आहे़ सर्वाधिक ७० टन कचरा इतवारा झोन मधून उचलण्यात येत आहे़ तर शिवाजीनगर, तरोडा, सिडको भागातून १५ ते २० टन कचरा उचलण्यात येत आहे़
कचऱ्यासाठी पुन्हा निविदा
By admin | Published: July 02, 2017 12:16 AM