छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या महिन्याभरात चौथ्यांदा तणाव निर्माण झाला. सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भागात धार्मिक द्वेष पसरवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातून परिसरात शेकडोंचा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. त्या नंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्या नंतर जमावाला शांत करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा भागात सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. काही अल्पवयीन मुलांनी दुचाकी वरून फिरताना आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. काही क्षणात तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्री अकरा वाजेपर्यंत व्हिडीओ परिसरात वाऱ्या सारखा पसरला. शेकडोंचा जमाव परिसरात जमण्यास सुरुवात झाली. काही सामाजिक प्रतिनिधींनी तरुणांची समजूत घातली. त्या नंतर उस्मानपुरा पोलीस ठाण्या समोर देखील मोठा जमाव जमला.घटनेची माहिती कळताच उपायुक्त नवनीत कॉवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, गौतम पातारे, सुशील जुमडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. वरिष्ठांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक विनोद आबुज, प्रवीण वाघ यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिडिओत अल्पवयीन मुलांचा सहभाग असून अल्लडपणात प्रकार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. परिसरातील वरिष्ठांच्या माध्यमातून व्हिडीओ द्वारे शांततेचे आवाहन करण्यात आले.
-शहरात रात्री ११ वाजे नंतर तणाव निर्माण होण्याची महिन्याभरात सलग चौथी घटना आहे. या पूर्वी सोशल मीडियावर वादग्रस्त कमेंट केल्या वरून जिन्सी परिसरात तणाव निर्माण झाला. यात एका तरुणाला अटक करण्यात आली. त्या नंतर रिक्षाच्या अपघाता वरून सिडको पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. तर हॉटेल शालिमार मध्ये दोन आंतरधर्मीय मुलगा मुलगी आल्याचे पाहून मध्यरात्री मोठा जमाव जमला होता. सातत्याने घडणाऱ्या घटनां मुळे मात्र आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.