औरंगाबाद : सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे. सर्व बाजूंनी विभाग मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पुढील वर्षीचा उन्हाळा मराठवाड्यासाठी अतिशय भयावह ठरण्याची चिन्हे आहेत. २०१२ नंतर २०१५ सारख्या परिस्थितीचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १५५ टँकरने १४५ गावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना जिल्ह्यात २१ टँकरने १५ गावांत पाणीपुरवठा होतो आहे. १८१ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. १६ विहिरींची त्यात वाढ झाली आहे. २२ गावे नव्याने टंचाईच्या यादीत आली आहेत. पावसाळ्यात अशी परिस्थिती असल्यामुळे पुढील काही महिन्यांत काय होईल, हे सांगणे अवघड आहे. ६३.४२ टक्क्यांवर मराठवाड्यातील पाऊस थांबला आहे. १ महिन्याचा खंड पडल्यामुळे विभागात टंचाई वाढली आहे. १०० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. ३७ टक्के पावसाचा खंड पडला आहे. किमान सरासरीच्या तुलनेत ८१ टक्के तरी पाऊस होणे अपेक्षित होते.
पावसाळ्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यात आजवर ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजवर सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. मार्चमध्ये १५५ आत्महत्यांची नोंद होती. जून महिन्यात तो आकडा ४३३ वर गेला. जुलै महिन्यात ५२७ वर आत्महत्यांची नोंद झाली, तर सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ६१८ आत्महत्यांचा अहवाल शासनाकडे विभागीय आयुक्तालयाने पाठविला होता. २५ सप्टेंबरपर्यंत ६३६ आत्महत्यांची नोंद झाली. मागील १२ दिवसांत १८ आत्महत्या विभागात झाल्या. १ जून ते २५ सप्टेंबर या ११७ दिवसांत २०३ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. पावसाळ्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे आकड्यांवरून दिसते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्या तणावातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढला.