औरंगाबाद : गतिमंद मुलाला घाटी रुग्णालयात सोडून देत आईवडिलांनी त्याच्या फोटोला हार चढवत 'तेरावा' घातल्याची संतापजनक घटना रांजणगावात उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे निर्दयी मातापिता सर्वांना सांगत होते. परंतु, परिसरातील काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोर आली असून त्यांच्या दबावामुळे पित्याने मुलाला आज घरी आणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ वर्षीय गतिमंद मुलाची सावत्र बापास अडचण होत होती. यामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी मुलाला कोरोना झाला असून घाटी येथे उपचार सुरु आहेत असे शेजाऱ्यांना सांगितले. तसेच आठच दिवसानंतर मुलाचे कोरोनात निधन झाले असून घाटी रुग्णालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर डोळ्यात खोटे अश्रू आणत निर्दयी मातापित्याने जिवंतपणीच मुलाच्या फोटोला हार चढवत त्याचा 'तेरावा' घातला.
दरम्यान, राजनगाव येथील युवक हाफिज शेख, अमोल शेवनकर, शुभम दुसांगे हे सोमवारी ( दि. १३ ) कामानिमित्त घाटी रुग्णालयात गेले होते. येथे तो गतिमंद मुलगा भिक्षा मागत असल्याचे दिसले. त्याच्याजवळ जात तुला घरी घेऊन जातो असे म्हटले. यावर मुलाने माझी आई नेण्यास येत आहे असे सांगत येण्यास नकार दिला. परत आल्यानंतर युवकांनी मुलाच्या मातापित्यास याची माहिती दिली असता त्यांनी तो कोणी दुसरा असेल म्हणू वेळ मारून नेली. मात्र, युवकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. सर्वांनी मिळून निर्दयी मातापित्यास मुलाला घेऊन या अन्यथा आम्ही पोलिसात माहिती देऊ असे खडसावले. यामुळे पित्याने घाटी रुग्णालयात जाऊन मुलाला घरी परत आणले. यानंतर शेजाऱ्यांनी गतिमंद मुलगा आणि बापाला पोलिस ठाण्यात नेले. येथे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी यापुढे मुलाला व्यवस्थित सांभाळण्याची बापाला तंबी दिली. तसेच मुलाला नवीन कपडे खरेदी करण्यासाठी पैसे ही दिले.