जळकोट : तालुक्यातील ५० हजार जनावरांना चारा घालण्यासाठी पशुपालकांची दमछाक होत आहे़ तालुक्यातील ऊस उत्पादकांकडून ऊस कारखान्याला देण्याऐवजी आता प्रत्येक सरी दोन हजार रुपये भावाने पशुपालकांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुका डोंगराळ भाग आहे़ तालुक्यात वाड्या-तांड्यांची मोठी संख्या आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पशुपालक जनावरांचे पालन करतात. प्रशासनाच्या यादीप्रमाणे म्हैस, गाय, भाकड जनावरे, शेळी-मेंढी आदी एकूण तालुक्यात ५० हजार जनावरांची संख्या आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आॅगस्ट दरम्यान केवळ दोनवेळा पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाबरोबरच चाऱ्याची उगवणही कमी प्रमाणात झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हिरवागार चाऱ्याची भारे शेतातून आणत आपल्या जनावरांना घालत असे. परंतु, शेतातच काही नाही, तर जनावरांना काय घालणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता. त्यामुळे साठवण तलाव, पाझर तलाव तुडूंब भरले होते. पाणीसाठा भरपूर असल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात दोन हजार उसाची लागवड केली होती. परंतु, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साठवण तलावात केवळ ८ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळीत घट झाली. परिणामी, विहीर, बोअरचे पाणी आटले आणि ऊस उत्पादकांच्या तोंडाला आलेला ऊस वाळू लागला आहे.पावसाळा संपत आला. आता पाऊस पडणे शक्य नाही. त्याचबरोबर कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या मनावर ऊस उचलला जातो. त्यानंतर वजन होऊन धनादेशाने पैसे घ्यावे लागतात. तालुक्यात सध्या भीषण चाराटंचाई असल्यामुळे ऊस लागवड शेतकऱ्यांकडे पशुपालक ऊस तोडून घेण्यासाठी गर्दी करीत उसाची एक सरी दोन हजार भावाप्रमाणे नगदी पैसे देऊन बैलगाडी अथवा ट्रॅक्टरने जाग्यावरून घेऊन जात आहेत. त्यामुळे ऊस कारखान्याला देण्यासाठी व कारखाना घेऊन जाण्यासाठी होणारा त्रास दूर होत असल्याने ऊस उत्पादकही खुश होऊन पशुपालकांना ऊस देत आहेत.
जळकोट तालुक्यात भीषण चाराटंचाई
By admin | Published: August 11, 2014 12:44 AM