बस-व्हॅनची धडक : दाट धुक्यामुळे घडला अपघात
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारंग मंडी मार्गावर सोमवारी कलाखटाई येथे बस आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर व्हॅनला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, अन्य १७ जण जखमी झाले.
बचाव पथकाच्या अधिकाऱ्यानुसार दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता असल्याने हा अपघात घडला.
अपघातानंतर भडकलेल्या आगीत व्हॅन पूर्णत: खाक झाली. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना इस्पितळात हलविले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. वाहने धडकल्याने व्हॅनच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने व्हॅनला आग लागली.
पंजाब प्रांतचे मुख्यमंत्री उस्मान बजदर यांनी शोक व्यक्त करून जखमींवर चांगले उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.