औरंगाबाद : पोलिसांची गस्त थंडावताच शहराच्या वेगवेगळ्या भागांत धुमाकूळ घालत चोरट्यांनी रविवारी रात्री तब्बल १५ दुकाने फोडली. फोटो कॅमेरे, दारू, औषधी, झंडू बाम, मोबाईल, खाद्यान्न असे हाती येईल तो माल चोरट्यांनी लंपास केला; परंतु १५ दुकाने फोडूनही चोरट्यांच्या हाती केवळ १ लाख ७०० रुपये एवढीच रोख रक्कम लागली. हर्सूल गावातील फोटो स्टुडिओ फोडून दोन कॅमेरे पळविले, तर जटवाडा रस्त्यावरील ९ विविध दुकाने, गॅरेज फोडून रोख रकमेसह अन्य किमती माल पळविला. कामगार चौकातील दोन दुकाने आणि बायपासवरील दोन औषधी दुकानेही फोडली. विश्रांती चौकातील दारू दुकान फोडून दारूचे बॉक्स नेले. एकाच रात्री चोरट्यांनी १५ दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
राधास्वामी कॉलनीतील रहिवासी शुभम काशीनाथ निकम यांच्या धनश्री मोबाईल शॉपी अँड मल्टी सर्व्हिसेसचे शटर अर्धवट उघडे दिसल्याने शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून कळविले. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता चोरीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी गल्ल्यातील २०० रुपये आणि दुरुस्तीसाठी आलेले सुमारे २२ हजारांचे तीन मोबाईल पळविले. त्यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. या दुकानापासून काही अंतरावरील गणेश मेडिकल स्टोअर फोडून ५ हजार रुपये चिल्लर ठेवलेला डबाही पळविला. सोमवारी सकाळी औषधी दुकानाशेजारील वडापाव विक्रेता आजिनाथ दौडकर यांच्या हा प्रकार नजरेस पडला. त्यांनी दुकानमालक भाऊसाहेब मिरगे यांना घटनेची माहिती दिली. मिरगे यांनी तात्काळ बेगमपुरा पोलिसांना ही घटना कळविली. विशेष म्हणजे मिरगे यांचे दुकान तिसऱ्यांदा फोडण्यात आले. दीड वर्षापूर्वी दोन चोरांना दुकान फोडताना रंगेहात पकडले होते. मिरगे यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोरटा चित्रित झाला.
या दुकानासमोरील माऊली कलेक्शन या कापड दुकानाचे पश्चिम बाजूचे शटर प्रथम चोरट्यांनी उचकटले. मात्र, आत काच असल्याचे पाहून दक्षिण बाजूचे दुसरे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गल्ल्यातील सुमारे ७ ते ८ हजारांची रोकड आणि चिल्लर, तसेच जीन्स पँटचे बॉक्स असा सुमारे ३५ हजारांचा माल चोरून नेला. दुकानमालक संजय साहेबराव साळुंके हे सहपरिवार दुकानाच्या मागे आणि वरच्या मजल्यावर राहतात. चोरट्यांनी दुकान फोडल्याची घटना सकाळी त्यांना समजली. त्यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
जटवाडा रोडवर दोन तास सुरू होता दोन चोरट्यांचा धुमाकूळचोरट्यांनी पहिली चोरी रात्री १.४० वाजेच्या सुमारास एकतानगरातील सिद्धिका किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न.रात्री २.०० अंबर मेडिकल स्टोअर रात्री २.१० वाजता अंबर हिल येथील किशोर ट्रेडर्स फोडले.रात्री २.३० वाजता एकतानगर येथील धनश्री मोबाईल शॉप.रात्री २.४५ वाजता माऊली कलेक्शन.रात्री ३.१० वाजता गणेश मेडिकल स्टोअर.रात्री ३.३० एकतानगर येथील जयदेव सॅनिटरी हे दुकान फोडले. रात्री ३.४० काशीद गॅरेज
एन-२ मध्ये दुकानफोडीच्या घटनासिडको एन-२, कामगार चौकातील गुरुदत्त स्टेशनरीचे शटर उचकटून चोरट्यांनी ५०० रुपये चोरून नेले. या दुकानाशेजारील दोन दुकाने सोडून तिसरे अथर्व लंच होमला चोरट्यांनी लक्ष्य केले. या दुकानातून नेमका किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. याविषयी त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार केली.
३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरीची घटना कैदजटवाडा रोडवरील चोरट्यांनी फोडलेल्या ८ पैकी गणेश मेडिकल स्टोअर, किशोर ट्रेडर्स आणि अंबर मेडिकल स्टोअर या ३ दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटे कैद झाले आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण पोलिसांनी हस्तगत करून चोरट्यांचा शोध सुरू केला. शिवाय कामगार चौकातील दुकान फोडणारे दोन चोर तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
एसीपी भुजबळ यांची घटनास्थळी धावसिडको विभागाचे सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, हर्सूल ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, फौजदार विजय पवार, कर्मचारी शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके, विनोद नितनवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.