औरंगाबाद : अहमदाबाद (गुजरात) येथील कारागृहात बंद असलेला आणि २०१२ मध्ये हिमायतबागेत झालेल्या चकमकीत एटीएस पथकातील पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात दहशतवादी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगमध्ये स्पष्ट आवाज ऐकायला येत नसल्याची तक्रार अबरारने केल्यानंतर न्यायालयाने त्याला सुनावणीप्रसंगी हजर करण्याचे आदेश दिले.
२६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. यावेळी दहशतवाद्यांनी एटीएसवर गोळी झाडण्यास सुरुवात केली. पोलीस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला, तर महंमद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाला. यावेळी पाठलाग करून एटीएसने अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्यप्रदेश) याला गजाआड केले होते.
त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या अतिरेक्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याला प्रत्येक सुनावणीसाठी हजर करण्याची सूचना न्यायालयाने केलेली आहे. १५ रोजी त्याच्या केसची सुनावणी असल्याने अहमदाबादच्या कारागृहातून त्याला आणून न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. त्याचे साथीदार नाशिक आणि औरंगाबाद जेलमध्ये बंद असून, त्यांनाही हजर केले जाण्याची शक्यता आहे.