या बैठकीला उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गावंडे, कन्नड डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी, शहरप्रमुख सुनील पवार आदींची उपस्थिती होती. यात भविष्यामध्ये १०० बेडची निर्मिती करून यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नवीन स्वतः स्वयंचलित ऑक्सिजन प्लांट बसविण्याची तयारी आ. उदयसिंग राजपूत यांनी दाखवली आहे. यासाठी कन्नड शहरातील डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्व नामांकित डॉक्टरांशी बोलून जनतेसाठी योगदानाविषयी प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण पवार यांनी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेसह इतर महत्त्वाच्या उपकरणांची मागणी केली.
चौकट
आमदाराने धमकावल्याचा आरोप
तालुक्यातील नाचणवेल येथील आदर्श हाॅस्पिटल येथील खाजगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी दर्शविली. त्यास प्रतिसाद देत जिल्हा शल्यचिकित्सकांनी परवानगी दिली. या गोष्टीचे कौतुक करण्याऐवजी तेथील डाॅक्टरांना स्थानिक आमदाराने धमकावल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे नेते संतोष कोल्हे यांनी केला आहे. ही वेळ खाऊगिरीची नसून, कोरोना या साथीच्या आजाराविरुद्ध लढण्याची आहे; परंतु कन्नडच्या आमदारास याचा विसर पडलेला दिसतो, असा आरोप त्यांनी केला. शहरातसुद्धा साई हाॅस्पिटलचे डाॅ. सुनील राजपूत व डाॅ. विनय राजपूत यांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनाही आमदारांनी विरोध केल्याचा आराेप कोल्हे यांनी केला आहे.