औरंगाबाद : शहरात शासनाच्या सहकार्याने मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटची चाचणी गुरुवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आठ दिवस चाचणी घेतल्यानंतर हा ऑक्सिजन प्लांट मनपा ताब्यात घेणार आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
या प्लांटमधून एका मिनिटाला २५० लिटर ऑक्सिजन तयार होणार असून, दिवसाला ४० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरले जाणार आहेत. या ऑक्सिजन प्लांटमधून तयार होणारा ऑक्सिजन मेल्ट्रॉनमधील ३०० बेडला पुरविला जाणार आहे. मेल्ट्रॉनमधील १५० बेडसाठी ऑक्सिजन लाईन टाकण्यात आलेली आहे. उर्वरित १५० बेडसाठी लाईन टाकली जाणार आहे. सध्या मेल्ट्रॉनमध्ये कोरोनाचे कमी रुग्ण दाखल आहेत. मेल्ट्रॉनमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येत असून, त्यानंतर जम्बो सिलिंडर भरले जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.