औरंगाबाद: अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि मंत्री असताना आदित्य ठाकरेंना विधानभवनात तैलचित्र लावायचे सुचलं नाही, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या एका कडवट शिवसैनिकांनी करुन दाखवले,अशी टिका राज्याचे राेहयोमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी येथे केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शहरात हिंदू जनजागरण दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीचौक येथून रॅलीला सुरवात करताना पालकमंत्री भुमरे हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर नातू आदित्य ठाकरे मंत्री होते.
मात्र त्यांना सुचलं नाही की, आपल्या वडिलांचे, आजोबा बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवना लावावं, याचं बाळासाहेबांना खरे दु:ख होत असेल. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तैलचित्र लावून करून दाखवलं, अशी टिका पालकमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. एकनाथ शिंदे आणि आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.