छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेसाठी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात शहरातील दोन आणि जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, शहरातील मध्य, पश्चिम हे दोन आणि सिल्लोड, वैजापुर येथून पक्षाने निष्ठावंत डावलून भाजपातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. काही मतदारसंघात बंडखोरी होण्याची देखील शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येत असताना ठाकरे गटाने जिंकण्याचे गणित मांडत थेट भाजपमधील नेत्यांना पक्षात घेतले. आज पहिली यादी जाहीर झाली तेव्हा यात भाजपामधून आलेल्या चार नेत्यांच्या हाती ठाकरे गटाने उमेदवारीची 'मशाल' दिली. यामध्ये औरंगाबाद पश्चिममधून राजू शिंदे, मध्यमधून किशनचंद तनवाणी, वैजापूरमधून दिनेश परदेशी, तर सिल्लोडमधून सुरेश बनकर या चार भाजपामधून ठाकरे गटात आलेल्यांचा समावेश आहे. पक्षाने पैठणची उमेदवारी अद्याप अंतिम केलेली नाही. तर कन्नडमधून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाकरे गटाने राबवला भाजपा पॅटर्नशिवसेनेत उभी फूट पडल्याने पक्षाला साथ देणाऱ्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी लॉटरी लागेल असे बोलले जात होते. दुसऱ्या फळीतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी कामाला जोरदार सुरुवात केली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने आयात नेत्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. यामुळे काही पदाधीकाऱ्यांनी उघडपणे विरोधीपक्ष नेत्याकडे नाराजगी व्यक्त केली. शिवाय औरंगाबाद मध्यच्या उमेदवारीचा वाद तर थेट मातोश्री पर्यन्त गेला होता. मात्र, ठाकरे गटाने भाजपाचाच पॅटर्न वापरुन विजयाचे गणित जुळविण्यासाठी आयात उमेदवाऱ्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला.