छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेला उमेदवार मिळत नसल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला जात असल्याची टीका सिडकोचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेच प्रवक्त आ. संजय शिरसाट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. पक्षात उमेदवारी मिळणार या अटीवरच भाजपमधून ठाकरे सेनेत पदाधिकारी प्रवेश करीत असल्याचे सांगून शिरसाट यांनी उद्धवसेनेतील निष्ठावंतांना देखील डिवचले.
आ. शिरसाट म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदारसंघांत उद्धवसेनेकडे उमेदवारच नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या लोकांवर ते निवडून येतील, अशी शक्यता नाही. त्यामुळे निष्ठावंतांना सोडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना ते पक्षात घेत आहेत. या सगळ्यात निष्ठावंतांनी काय करायचे हे त्यांनी ठरवावे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत करावी. केंद्र सरकारच्या या दुरुस्तीला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल, असे मत व्यक्त केले आहे.
यावर आ. शिरसाट म्हणाले, पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले. त्यावेळी त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय का घेतला नाही. निवडणुका आल्यानंतर अशा चर्चा केल्या जातात, असा टोला त्यांनी लगावला. आ. नरहरी झिरवळ यांनी केलेले आंदोलन त्यांना न शोभण्यासारखे असल्याचेही त्यांनी नमूद केले.