उदगीर : संचिताच्या मानदंडाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली़ खेड्यापाड्यापर्यंत सर्व जातीधर्मांच्या साहित्यीक व रसिकांना जोडत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी निर्माण केलेल्या संस्कृतीची केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर साता समुद्रापार देशांनीही दखल घेतली आहे, असे कौतुकोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले़ उदगीर येथे बुधवारी मसाप शाखेच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला़ अध्यक्षस्थानी मसाप कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके होते तर प्रा़ भास्कर बडे, अनुराधा पाटील, ललीता सबनीस, रसिका देशमुख, संजय ऐलवाड, सुधाकर वायचळकर, एस़ बी़ चव्हाण, एम़ जी़ मोमीन आदींची प्रमुख उपस्थिती होती़ अमृत महोत्सव वर्षानिमित्त ठाले पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला़ मान्यवरांच्या हस्ते ‘कौतिकामृत’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले़ संपादक धनंजय गुडसूरकर यांनी या अंकामागील भुमिकाही यावेळी विषद केली़ यावेळी सबनीस म्हणाले, महाराष्ट्रातले सांस्कृतिक सोहळे जातीबध्द आहेत़ दहशतवाद, जातीय दंगल, नक्षलवाद यांना समूळ नष्ट करण्यासाठी सत्यनिष्ठ व विवेकनिष्ठ साहित्य गरजेचे आहे़ राजकारण्यांकडे निष्ठा गहाण न टाकता किंबहुना त्यांच्या खिशात न राहता साहित्यिकांनी लेखन करावे असे सबनीस म्हणाले़ हा आत्मीयतेचा सोहळा असून महाराष्ट्र पातळीवर अमृतमहोत्सव साजरा झाला पाहिजे याची सुरुवात उदगीरकरांनी केली , उदगीरचा सांस्कृतिक चेहरा समृध्द आहे असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला़ अनुराधा पाटील यांनी मनोगतात दोन कविता सादर केल्या़ प्रास्ताविक चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी केले़ सूत्रसंचालन अनिता यलमटे यांनी केले तर आभार विवेक होळसंबरे यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुर्यकांत शिरसे, प्रशांत शेटे, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, रामदास केदार, अंबादास केदार, प्रा़ डॉ़ मारोती कसाब, प्रा़ राजपाल पाटील यांच्यासह मसाप पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला़ (वार्ताहर)
नव्या संस्कृतीची जडणघडण म्हणजे ठाले पाटील
By admin | Published: August 25, 2016 12:47 AM