लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (दि.५) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चार तास चालले. एकदाचे आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बाहेर आले. मात्र, सवाल जबाब होत असल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चातर्फे राज्यभरात खासदार, आमदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी सकाळी आंदोलकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे उस्मानपुरा भागातील घर गाठत आंदोलन केले. यावेळी थाळीनाद, घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलन सुरू झाल्यानंतर विधानसभाध्यक्ष बाहेर निघून गेले. तरीही आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली नाही. तीन तासांनंतर पोलीस बंदोबस्तासह बागडे घरी पोहोचले. यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगासह इतर कार्यवाहीची माहिती आंदोलकांना दिली. याचवेळी आरक्षण भाजप सरकारच देईल, अशी ग्वाही दिली. त्यावर मीच स्वाक्षरी करणार असल्याचेही सांगितले. मात्र,आंदोलकांचे समाधान झाले नाही. कालबद्ध कार्यक्रमाची विचारणा केली. यावेळी कुणालाही उत्तरे न देता बागडे वाहनातून पुन्हा बाहेर निघून गेले. आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी एक वाजेपर्यंत हे थाळीनाद आंदोलन चालले.क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरूचक्रांतीचौकात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारी सुरूच होते. दिवसभर विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आंदोलनस्थळी भेट देत होत्या. याचवेळी रवींद्र काळे आणि एका युवकात घोषणाबाजी, भाषण करण्यावरून वाद झाला. यात नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविल्याचा प्रकार दुपारी दोन वाजता घडला.
विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:26 AM