छत्रपती संभाजीनगर: शासकीय नियमानुसार पोलीस ठाणे प्रमुखांच्या बदल्या होतील, ते दुसरीकडे रूजू होतील पण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचा मोबाइल नंबर मात्र बदलणार नाही. कारण पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेनुसार 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' या योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहे.एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ठाणेदार म्हणून ते वापरत असलेला मोबाइलक्रमांक नव्या ठाणेदाराकडे देऊन जातील.
या योजनेविषयी अधिक माहिती देताना शहराचे पाेलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की, सामान्य जनता आणि पोलीस अधिकारी यांच्यात कायम सुसंवाद असावा, संकट समयी सहज पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करता यावा, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल ही संकल्पना पुढे आली आहे. विद्यमान ठाणेदाराचा मोबाइल क्रमांक नागरीकांकडे असतो. कालांतराने एखाद्या संकटसमयी नागरीक जेव्हा त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात, तेव्हा त्या अधिकाऱ्याचा मोबाइल लागत नाही अथवा त्या अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली झाल्याचे त्यांना समजते. नव्या अधिकाऱ्यााच मोबाइल माहिती नसल्याने वेळेत संपर्क होऊ न शकल्यास संकटसमयी तातडीने मदत मिळत नाही.
यापुढे असे होऊ नये, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल संकल्पना आहे. बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी नव्या ठाणेदाराकडे चार्ज देताना तो त्यांचा मोबाइल सीम देईल. यामुळे ठाणेदाराचा मोबाईल क्रमांक कायम असेल. अशाप्रकारे वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल वापरणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले. १ जूनपासून शहर पोलीस दलात राबविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना अधिकाऱ्यांच्या नवीन नंबरचे फलक पोलीस आयुक्तांनी दिले. यापत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, उपायुक्त शिलवंत नांदेडकर आणि गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.
संवेदनशील ठिकाणी असेल २४ तास राहुटीशहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील कॉलनी, चौकात आता कायमस्वरुपी सशस्त्र पोलिसांची राहुटी असेल. यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात दंगा काबू पथकाला आवश्यक शस्त्र आणि साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे. जेणेकरून ऐनवेळी ही साहित्य घेऊन पोलीस घटनास्थळी तात्काळ पेाहचतील.