औरंगाबाद : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एमआयएम पक्षातर्फे ( MIM ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांचे उपहासात्मक जंगी स्वागत करण्यात येणार आहे. चिकलठाणा विमानतळ ते सुभेदारी विश्रामगृहापर्यंत तुतारी, पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत खा. इम्तियाज जलील ( MP Imtiyaz jalil ) यांनी दिली.
यावेळी खा. जलील उपरोधात्मक म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी औरंगाबादेत आजपर्यंत १४ कर्तृत्ववान महापौर दिले, कचऱ्याचा प्रश्न सोडवला, स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी दिले, औरंगाबाद विकास आराखड्याचे तीन तेरा केल्याबद्दल, उत्तम आरोग्यसेवा, चौकाचौकात शिवभोजनाची सुविधा, मनपावर भगवा फडकल्यानेच शहरातील रस्ते उत्तम आहेत, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या निर्मिती केली, कोरोना संकटात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सेवा दिली, माजी खासदारांनी संसदेत उल्लेखनीय कामगिरी केली, विमानसेवा व्यापक केली, शैक्षणिक संस्थांच्या दर्जा उंचावला, प्रत्येक रस्त्यावर दिवाबत्तीची उत्तम सोय केली, रेल्वेमार्ग विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, युवकांना रोजगार दिला, पर्यटन विकासाचे पॅकेज दिल्याबद्दल, संतपीठ व वारकरी भवनासाठी बैठका घेतल्याबद्दल, मराठवाड्यातील दुष्काळ व अतिवृष्टीचे प्रश्न तत्परतेने सोडविले, सिंचनाचा अनुशेष भरून काढला, खेळाडूंना क्रीडा विद्यापीठ दिले, औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास, याबद्दल १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणार आहोत.
पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. लोकशाहीत मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू शकतो. त्यामुळे हा स्वागताचा वेगळा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विविध विकासकामांचे फलकही आम्ही दाखविणार असल्याचे जलील यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद यांची उपस्थिती होती.