औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्वांना आपल्याकडील ज्ञान भरभरून दिले. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींनी दाखविलेल्या मार्गानुसार त्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर समान प्रेम केले. अशा गुरुजनांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृतज्ञतेचा हा हृद्य सोहळा उपस्थितांनी अनुभवला...प्रसंग होता विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याचा. ज्यांनी ज्ञानदानाद्वारे दोन सुसंस्कृत पिढ्या घडविल्या. अनेक जुने विद्यार्थी रस्त्यात भेटल्यावर त्यांना वाकून नमस्कार करतात; पण या गुरुजनांनी कधीच याचा गर्व बाळगला नाही. कधी कोणता पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशा ज्येष्ठ शिक्षक, प्राध्यापक तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मिलाफ या सोहळ्याच्या निमित्ताने बघावयास मिळाला. या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले माजी प्राचार्य शरद पिंगळे, निवृत्त प्राध्यापक डॉ. नीळकंठ बापट, सुशीलाताई अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे.ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील शिक्षक, प्राध्यापकांचा मान्यवर सत्कार करीत होते तेव्हा प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रती आपला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करीत होता. समाजबांधवांनी केलेला आमचा सन्मान आमच्यासाठी राष्ट्रपतीपदकापेक्षा मोठा आहे, अशा भावना सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केल्या. त्यावेळी सर्वांचे हृदय अभिमानाने भरून आले होते. मोडी लिपीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन काही शिक्षकांनी केले. त्याचवेळी ब्राह्मण युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर यापुढेही यशोशिखर गाठत राहावे, असा आशीर्वाद काही शिक्षकांनी दिला. प्रमुख पाहुणे नीळकंठ बापट यांनी ज्ञानी मानुष्य कसा असतो याचे सर्वोत्तम उदाहरण भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर होते, असे सांगत त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. प्रारंभी, अशोक केळकर यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक सतीश शिरडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना जोशी व ए.पी. कुलकर्णी यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी कुमार कुलकर्णी, सुहास सहस्रबुद्धे, अनुराधा कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कृतज्ञतेचा सोहळा
By admin | Published: September 21, 2014 11:53 PM