औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशामुळे दहीहंडीतील मानवी थरांचा थरार ओसरला होता, पण गोविंदांचा उत्साह मात्र, टिकून होता. प्रत्येक राजकीय पक्षप्रणीत दहीहंडी उत्सवात शहर व पंचक्रोशीतील गोविंदा पथक सहभागी झाले होते. दहीहंडी कोण फोडतो हे पाहण्यासाठी शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘गोविंदा गोविंदा’ असा जयघोष करीत चार ते पाच थर रचत सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांनी सर्वांची मने जिंकली. ‘ संघटन में शक्ती है’ याचा प्रत्यय गुरुवारी दहीहंडीच्या निमित्ताने आला. यंदा शहरापेक्षा सिडको-हडकोत दहीहंडीच्या आयोजकांची संख्या आणि गर्दीचा उच्चांक पाहण्यास मिळाला. सिडकोतील कॅनॉट गार्डन परिसरात चक्क चार ठिकाणी वेगवेगळ्या आयोजकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. परिणामी, चोहीबाजूने गर्दी उसळली होती. टेम्पो, लोडिंग रिक्षा भरून गोविंदा पथके कॅनॉट प्लेस परिसरात दाखल होत होते. डीजेच्या तालावर सर्वजण बेभान नृत्य करीतच येत होते.निराला बाजार : मनसेने फोडली निषेधाची दहीहंडी एकाहून एक सरस गाण्यांचे सादरीकरण, त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईचा अभूतपूर्व जल्लोष आणि ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘कृष्ण भगवान की जय’ या जयघोषात गुरुवारी निराला बाजारचा परिसर गोविंदामय झाला. मनसेने दहीहंडी अगदी खाली आणून फोडत दहीहंडीसाठी मानवी मनोऱ्याला केलेल्या २० फुटांच्या मर्यादेच्या निर्णयाचा निषेध केला.४निरालाबाजार चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ‘राजयोग प्रतिष्ठान’तर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता महोत्सवाला सुरुवात झाली. एक एक गोविंदा पथक येऊन सलामी देत होते. २० फुटांपेक्षा उंच दहीहंडी असणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये नाराजी होती. मात्र, थर लावण्याचा उत्साह कायम होता. यावेळी अगदी चार ते पाच थर लावण्यासाठी गोविंदांमध्ये स्पर्धा आणि तरुणाईचा जल्लोष यामुळे वातावरण अधिक रंगले होते. हा दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी निरालाबाजार परिसरात खचून गर्दी झाली होती. सलामी देण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस दिसून आली. विशेष व्यवस्था करण्यात आल्याने महिलांनीसुद्धा महोत्सवाचा आनंद घेतला. शिवशक्ती क्रीडा मंडळ, शिवछत्रपती, हरिओम गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी एका गोविंदा पथकाने पाच थर लावले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुभाष पाटील, आयोजक संजोग बडवे, सुमित खांबेकर, अमोल खडसे, विशाल आहेर, सुभाष साबळे, ललित सरदेशपांडे आदींची उपस्थिती होती. अखेरीस कृष्णाची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांच्या हातून अगदी खाली आणलेली दहीहंडी फोडून मानवी मनोऱ्यासाठी दिलेल्या निर्णयाचा निषेध क रण्यात आला.गोविंदांनी मने जिंकली जयभद्रा मित्रमंडळ (राजाबाजार), जबरे हनुमान मंडळ (जाधवमंडी), जय भोले क्रीडा मंडळ (चेलीपुरा), हर हर महादेव गोविंदा पथक (नारळीबाग), शिवमुद्रा गोविंदा पथक (चौराहा), पावन गणेश क्रीडा मंडळ (नारळीबाग), रामराज्य गोविंदा पथक (छावणी), सिद्धीविनायक गोविंदा पथक (चौराहा), जयराणा गोविंदा पथक (नवाबपुरा), उत्तरमुखी हनुमान गोविंदा पथक (बुढीलेन), मांगीरबाबा युवा क्रीडा मंडळ (फाजलपुरा), शंभूराजे मित्रमंडळ ( टीव्ही सेंटर), हरिओम गोविंदा पथक (अंगुरीबाग), शिवसेना गोविंदा पथक (मुलमची बाजार), जय श्रीराम गोविंदा पथक (औरंगपुरा), जय बजरंग क्रीडा मंडळ (चेलीपुरा) आदींनी शहरवासीयांची मने जिंकली.
‘थर’थराट ओसरला
By admin | Published: August 25, 2016 11:49 PM