छत्रपती संभाजीनगर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने ७३.३२ हेक्टर आर जागा शेतकऱ्यांक़डून खरेदी केली व ती शेती नियमित माल खरेदी-विक्रीसाठी. मात्र, त्यातील १० एकरवर स्मार्ट सिटीसाठी बस डेपो उभारले जात आहे. यासाठी कृउबा समितीने परवानगी दिली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कार्यालयाने बसडेपोचे बांधकाम तत्काळ बंद करावे, नसता न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिला.
जाधववाडीतील कृउबा समितीचे सभापती झाल्यानंतर पठाडे यांनी पहिली पत्रपरिषद गुरुवारी घेतली. कृउबाच्या कायद्यानुसार येथे बसडेपो उभारल्या जात नाही. मनपाने त्या १० एकर जागेवर आरक्षण टाकले होते. तसेच मनपात व कृउबात जागेसंदर्भात करार झाला होता. त्यानुसार ठरवून दिलेल्या मुदतीत मनपाने बांधकाम केले नाही. यामुळे जुना करार रद्द झाला. आता कृउबाला जागा कमी पडत आहे. तिथे शेतीमाल ठेवण्यासाठी गोदाम,शीतगृह बांधायचे आहेत. त्यासाठी कृउबाला जागा परत द्या किंवा नवीन रेडिरेकनर दराप्रमाणे बाजार समितीला रक्कम द्या, असे पठाडे यांनी नमूद केले.
मोंढ्यातील ‘त्या’ व्यापाऱ्यांना देणार नोटिसा
मोंढ्यातील ज्या व्यापाऱ्यांनी जाधववाडीत कृउबामध्ये जागा घेतली आहे. पण आजपर्यंत बांधकाम सुरू केले नाही. अशा व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहे. बांधकाम करून व्यवसाय सुरू केला नाही तर त्यांची जागा जप्त करण्यात येईल, असा इशारा सभापतींनी दिला.
सुभाष देसाई, खैरेमुळेच बंद पडले शॉपिंग सेंटरचे बांधकाम
सनी मार्केट समोरील कृउबाच्या गेटच्या आजूबाजूला दोन मजली शॉपिंग सेंटर उभारण्याचे काम आमचे संचालक मंडळ असताना आम्ही हाती घेतले. ८० टक्के काम पूर्ण झाले. पण जेव्हा प्रशासक जगन्नाथ काळे असताना पालकमंत्री सुभाष देसाई व चंद्रकांत खैरे यांनी हे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोन ते तीन वर्ष बांधकाम रखडल्याचा आरोप सभापती पठाडे यांनी केला