छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समीक्षा खंडारे (वय ३५) या महिलेने २२ ऑगस्ट रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. मनपाने अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले. मनोरुग्ण असलेली महिला एका उच्चभ्रू व सुशिक्षित कुटुंबातली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सिटीचौक पेालिसांनी दोन दिवस तपास करून कुटुंबाचा शोध लावला. गुरुवारी समीक्षा यांच्यावर शहरातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतल्याचे सिटीचौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले. शहरात इतरत्र फिरून काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समीक्षा यांनी संरक्षण भिंतीलगत अतिक्रमण करत कच्चे बांधकाम सुरू केले. २२ ऑगस्ट रोजी मनपाने ते अतिक्रमण काढले. समीक्षा यांचे वागणे मनोरुग्णासारखे असल्याने पथकाने त्यांना दुसरीकडे नेऊन सोडले व बांधकाम पाडून सर्व साहित्य उचलून नेले. काही वेळाने पुन्हा परतलेल्या समीक्षा यांनी संतापात तेथील रॉकेल अंगावर घेत पेटवून घेतले. चार तासातच घाटी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तत्काळ महिलेच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. समीक्षा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबाला संपर्क केल्यानंतर ते गुरुवारी शहरात दाखल झाले. समीक्षा यांनी बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले होते. त्यांचा एक भाऊ पशुवैद्यकीय डॉक्टर असून एक भाऊ अभियंता आहे. सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या समीक्षा यांच्यावर मात्र शिक्षणानंतर अचानक मानसिक आघात झाला. घरातही अनेकदा आग लावणे, स्वत:चे कपडे त्या जाळून टाकत होत्या. त्यातूनच त्यांनी घर सोडले व घरी पुन्हा परतल्याच नाहीत, असे कुटुंबाने सांगितले.