छत्रपती संभाजीनगर : 'ए लाेगो की औकात नही है, फिर भी गाडी पे घुम रहा है...' असे बोलल्यामुळे रागाच्या भरात चाकूचे सपासप वार करीत खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली. गुन्हे शाखेने बेगमपुऱ्यातील विशाल शिंदेच्या खुनाचा आरोपी गणेश पटारे यास आवघ्या २४ तासांच्या आत अहमदनगरजवळच्या एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केल्याची माहिती निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
बेगमपुऱ्यातील माळीवाडा गल्लीत मित्रांसोबत गप्पा मारीत बसलेल्या विशाल कैलास शिंदे या तरुणाची गणेश सूर्यकांत पटारे याने छातीसह गळ्यावर चाकूचे घाव घालीत निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी गणेश पटारे फरार झाला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकास आरोपी अहमदनगरजवळील संदीप हॉटेलमध्ये जेवण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून हॉटेलमध्ये येताच आरोपी गणेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये आरोपी गणेशच्या भावावर मृत विशाल शिंदे, मयूर आडुळे या दोघांनी चाकू हल्ला केला होता.
या प्रकरणात विशाल व मयूर यांच्या विरोधात जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा नोंदविला होता. सध्या मयूर आडुळे हा हर्सूल कारागृहात आहे. शुक्रवारी रात्री मृत विशाल मित्रांसोबत गप्पा मारीत होता. त्याचवेळी दुचाकीवरून आरोपी गणेश जात असताना त्यास उद्देशून मृत विशाल 'ए लाेगो की औकात नही है, फिर भी गाडी पे घुम रहा है...' असा म्हणाला. त्यामुळे संतापलेल्या गणेश याने घरी गाडी लावून परत चाकू घेऊन आला. येताच त्याने थेट विशालच्या छाती, गळ्यावर चाकूचे खोलवर वार केले. फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथकाने पथके पाठविली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार नगरजवळील एका हॉटेलमधून आरोपीस पकडले. ही कारवाई निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अश्वलिंग होनराव यांच्या पथकाने केली.
चार दिवसांची पोलिस कोठडीआरोपी गणेश अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आठ दिवसांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने चार दिवसांची कोठडी मंजूर केली. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.