औरंगाबाद : कर्णपूरा येथे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या चौघा भाविकांच्या घोळक्यातून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने रॉंग साईडने येऊन एका भाविकाचा महागडा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार ३ ऑक्टोंबरच्या पहाटे अडीच वाजेदरम्यान घडला. भाविकाने तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली असता, पोलिसांनीही रात्र गस्तीवरील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकाच तासाभरातच सीसीटीव्हीच्या आधारे दोघापैकी एकाला पाठलाग करुन बेड्या ठोकल्या.
अजय रामदास गोराडे (२१, रा. तिरुमल्ला मंगल कार्यालय परिसर) असे आरोपीचे नाव आहे. एकजण पळून गेला. रविंद्र क्षीरसागर हे शेजारी राहणारे अंकुश चौरे, संजय काशिद, रुद्र काशिद यांच्यासह गुरुदत्तनगरातून विजयनगर ते जवाहनगर ठाण्याच्याजवळून कर्णपूरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जवाहरनगर-उल्कानगरी रस्त्यावर चेतक घोडा चौकाजवळ रॉंग साईडने दुचाकीवर आलेल्या दोघां चोरट्यापैकी मागे बसलेल्या एकाने रविंद्र यांनी वेळ पाहण्यासाठी खिशातून काढलेला महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. दरम्यान रविंद्र यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. रात्रीच्या कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी पथकाच्या मदतीने सीसीटीव्ही तपासले असता, चोरट्याने मोबाईल हिसकावून घेताना दिसला. दरम्यान चोरटे हे विजयनगर चौकाकडे गेल्याचे सीसीटीव्हीत दिसल्यामुळे सापळा लावला. दरम्यान पोलिसांना बघून चोरट्यांनी पळ काढला मात्र एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती गायके, चंद्रकांत पोटे, नरेंद्र देगलूर, बालाजी काळे, मारोती गोरे, वामन नागरे, ज्ञानेश्वर शेलार यांच्या पथकाने केली.